केंद्राचा मोठा निर्णय; सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या!


नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोनच दिवसांपूर्वी राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारने देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं देखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केल्यामुळे कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि ११वीच्या प्रवेशांचे काय? अशी चर्चा सुरू झाली असून त्यांच्या गुणपत्रिका ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियानुसार तयार करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईपरीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. पण, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता सीबीएसईकडून १ जून रोजी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.