मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सध्या सीबीआय चौकशी सुरू आहे. पण अनिल देशमुख यांनी चौकशीत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे.
अनिल देशमुखांचा सीबीआय चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा
सीबीआय चौकशीला अनिल देशमुख हजर झाले असून मागील 7 तासांपासून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी आणखी काही तास सुरू राहणार आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, आपल्यावरील सर्व आरोप अनिल देशमुख यांनी फेटाळून लावले आहे.
आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन आणि चुकीचे असल्याचा दावा देशमुखांनी केला आहे. महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा काही अधिकाऱ्यांचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले. पण मला माहित नाही, माझा काहीही संबंध नाही, अशी उत्तरे अनिल देशमुख यांनी दिली.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली या प्रकरणानंतर परमबीर सिंग यांची बदली केल्यामुळे त्यांनी पत्र लिहिले आहे. एटीएसने कारमायकल रोड गाडी प्रकरणी केलेल्या तपासानुसार परमबीर सिंग यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. डीसीपी राजू भूजबळ आणि एसीपी संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबात स्पष्ट केले. कोणतीही वसुली करायला मी त्यांना सांगितले नसल्याचेही देशमुख यांनी सांगितले आहे.