मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊनच्या निर्णयानंतर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा दळभद्रीपणा समोर आला – पृथ्वीराज चव्हाण


कराड – आजपासून राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला असून आज रात्री ८ वाजल्यापासून या लॉकडाऊनला राज्यभरात सुरुवात झाली असून यामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण विरोधकांनी राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनवर टीका केली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊन पॅकेजवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा तोकडेपणा आणि दळभद्रीपणा समोर आला आहे. आपण सरकार सोबतच आहोत, असे म्हणून अंमलात आणलेल्या निर्णयावर भाजप फक्त राजकारण करत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा केली. यामध्ये १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक सेवा वगळता इतरांना प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सबळ कारणाशिवाय प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासोबतच, लॉकडाऊनमुळे ज्यांच्या पोटावर पाय येण्याची शक्यता आहे, अशा वर्गासाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी लॉकडाऊनच्या निर्णयावर तोंडसुख घेतले आहे. लॉकडाऊनमध्ये घोषणा केलेल्या योजना म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर जनतेची मुख्यमंत्र्यांनी बोळवण केली असल्याचे म्हणत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी यावरून आता विरोधकांवर तोंडसुख घेतले आहे. संचारबंदीचा क्रांतीकारक असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पण सरकारच्या या निर्णयावर भाजप नेते टीका करत असल्यामुळे त्यांचा तोकडेपणा आणि दळभद्रीपणा समोर आल्याचे चव्हाण म्हणाले आहेत.

राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना, राज्याची तिजोरी मोकळी असताना सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. मोदी सरकारने मागील टाळेबंदीमध्ये फक्त धान्य वाटपाच्या रूपाने तुटपुंजी मदत केल्याचे देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.