पहाटेच्या अंधारात दिसलेल्या लाईटच्या रांगेचे रहस्य उलगडले

ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागात गेल्या गुरुवारी पहाटे पाच ते साडेपाच च्या दरम्यान नागरिकांना एकामागून एक मंद गतीने जात असलेल्या लाईट्सची प्रचंड मोठी रांग दिसल्याने काही काळ एकच घबराट माजली होती. सुरवातीला ही विमाने असावीत अशी नागरिकांची कल्पना झाली होती पण हे दिवे इतक्या संथ गतीने जात होते की विमानांची शक्यता नाकारली गेली. एकामागून एक जाणाऱ्या या दिव्यांचा कोणताही आवाज येत नव्हता आणि ते सरळ पृथ्वीच्या कक्षेतून येत असल्याचे दिसत होते.

या रहस्याबाबतचा खुलासा त्वरित करण्यात आला. हे लाईट म्हणजे एलोन मस्क यांच्या महत्वाकांक्षी ‘स्टार लिंक’ प्रोजेक्टचा हिस्सा असलेले उपग्रह होते असे स्पष्ट करण्यात आले. एलोन मस्क यांनी जगभरात अंतराळातून हायस्पीड इंटरनेट देण्याची महत्वाकांक्षी योजना आखली असून त्यात अंतराळात स्थापित केलेल्या शेकडो उपग्रहांच्या माध्यमातून पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात, अगदी दुर्गम ठिकाणी सुद्धा हायस्पीड नेट उपलब्ध होणार आहे. यासाठी दोन हजाराहून अधिक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापन केले जाणार असून त्यातील पहिले साठ उपग्रह सोडले गेले आहेत. आकाशात दिसलेली लाईटची माळ म्हणजे हे उपग्रह होते असे समजते.

या नव्या उपक्रमामुळे पृथ्वीवर इंटरनेट साठी टॉवर उभारावे लागणार नाहीत. ग्राहकाला फक्त एक सॅटेलाईट डिश घराच्या छतावर लावावी लागेल. त्यातून अंतराळातील उपग्रहांच्या माध्यमातून हाय स्पीड इंटरनेट त्यांना मिळणार आहे. हे सर्व उपग्रह पृथ्वीभोवती फिरणार असल्याने जगाच्या पाठीवर कुठेही इंटरनेट उपलब्ध होणार आहे.