रेमडेसिवीर टंचाई ७ ते १० दिवसात संपणार  

सध्या देशभर अँटीव्हायरल ड्रग रेमडेसीवीरची टंचाई असली तरी येत्या ७ ते १० दिवसात १० ते २० लाख डोस बाजारात उपलब्ध होतील असा दिलासा उत्पादक कंपन्यांनी दिला असून टंचाई निर्माण होण्यामागच्या कारणाचा खुलासाही केला आहे. रेमडेसीवीरची कमतरता निर्माण होण्यामागे केवळ करोना रुग्ण संख्येतील प्रचंड वाढ हे एकमेव कारण नसल्याचे या कंपन्यानी स्पष्ट केले आहे.

औषध निर्माण कंपन्यातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२० मध्ये करोना प्रभाव खुपच ओसरला होता आणि त्यामुळे रेमडेसीवीरची मागणी कमी झाली होती. हे औषध मोठ्या प्रमाणावर उत्पादित करून ठेवता येत नाही कारण त्याची मुदत ६ ते ८ महिने इतकीच आहे. डिसेंबर पासून मागणी कमी झाल्याने कंपन्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये उत्पादन कमी केले होते. मात्र मार्च पासून करोना केसेस अचानक वाढू लागल्या आणि रेमडेसीवीरची मागणीही. पूर्वी ही मागणी फक्त महानगरे आणि मोठ्या शहरातून होती. आता मात्र छोटी शहरे, गावे, खेडी येथूनही मागणी येत आहे. कंपन्यांचे वितरण जाळे खेडोपाडी, लहान शहरात पुरवठा करण्याइतके सक्षम नसल्याने मागणी नुसार पुरवठा होऊ शकला नाही.

मात्र मार्चच्या मध्यापासून कंपन्यांनी रेमडीसीवीरचे उत्पादन वाढविले आहे. त्यामुळे १० दिवसात लाखो डोस बाजारात उपलब्ध होतील. इंडियन ड्रग मॅन्यूफॅक्चरिंग असो.चे अध्यक्ष महेश दोशी म्हणाले, सरकार आणि उद्योग मिळून काम करत आहेत. निर्यात बंदी मुळे देशात या औषध साठ्याच्या स्थितीत सुधार होण्यास मदत झाली आहे. भारतात सहा कंपन्या या औषधाचे उत्पादन करतात. दर महिना ४० लाख डोस उत्पादनाची त्यांची क्षमता आहे. १२० देशांना निर्यातही केली जाते.