अंबानीच्या छताखाली हॅमलेज भारतात उघडणार ५०० दुकाने

सुपर रिच किंमतीसाठी प्रसिद्ध असलेली युकेची २६१ वर्षे जुनी खेळणी कंपनी हॅमलेज रिलायंस उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या साथीने नव्याने भारतात स्वतःचे स्थान निर्माण करणार आहे. अनेक वर्षे नुकसानीत चाललेल्या ब्रिटीश रिटेल आयकॉन हॅमलेजचे ६३ वर्षीय मुकेश अंबानी यांनी २०१९ मध्ये अधिग्रहण केले आहे. देशात करोना प्रकोप असला तरी पुढील तीन वर्षात हॅमलेजची ५०० दुकाने सुरु केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

हॅमलेज स्टोर्स त्यांच्या कार्निव्हल लुक साठी जगभरात प्रसिद्ध आहेत. येथे मुले खेळण्यांशी खेळू शकतात. व्हिडीओ गेम्सचा आनंद घेऊ शकतात. ही खेळणी अतिशय महाग असली तरी त्याबाबत ग्राहकांना मोठे आकर्षण आहे. भारताचा विचार केला तर देशात १४ वर्षांखालील मुलांची संख्या मोठी आहे. शिवाय दरवर्षी २.६ कोटी नवीन बालके देशात जन्माला येतात. एकूण खेळणी बाजार जगात ९० अब्ज डॉलर्सचा आहे मात्र त्यात भारताचा वाटा केवळ १ टक्का आहे. यामुळे भारतात खेळणी उद्योग विकासाला मोठी संधी आहे.

करोना मुळे वर्क फ्रॉम होम संस्कृती वेगाने वाढली आहे. अश्या वेळी खेळण्यांची मागणी सुद्धा वाढती आहे. हॅमलेज इंडिया या संधीचा फायदा घेऊन येत्या पाच वर्षात त्यांचा ३० टक्के व्यवसाय ऑनलाईन वर नेण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या ऑनलाईन व्यवसाय २० टक्के आहे. भारताचा विचार केला तर हॅमलेजला ग्राहकांची कमतरता भासणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे.