अमेरिकेने दिले ‘या’ कोरोना लसीचा वापर थांबवण्याचे आदेश


वॉशिंग्टन: कोरोना महामारीशी मुकाबला करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लसीकरण मोहिम जोरात सुरू आहे. फायजर, मॉडर्ना आणि जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या लसीचा अमेरिकेत वापर सुरू आहे. पण, आता जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या लसीचा वापर काही काळासाठी थांबवण्याची सुचना अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने केली आहे. ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’च्या लसीच्या वापरानंतर अमेरिकेतील सहा जणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे समोर आले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ सह फायजर आणि मॉडर्नाची लस अमेरिकेतील लसीकरणात वापरण्यात येते. अमेरिकेत आतापर्यंत ६.८ दशलक्ष जणांना ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ची लस देण्यात आली आहे. त्यापैकी सहाजणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे समोर आले असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटले आहे. ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’च्या कोरोना लसीचा एकच डोस घ्यावा लागतो. तर, इतर लशींचे दोन डोस घ्यावे लागतात.

रक्ताची गाठ झाल्याची तक्रार करणारे सहाही महिला असून १८ ते ४८ या वयोगटातील आहेत. कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतर सहा ते १३ दिवसानंतर लक्षणे आढळून आली. डॉक्टरांनी रक्ताच्या गाठींवर हेपरिनने उपचार सुरू केले. पण, हे प्रकरण गंभीर असू शकते आणि वेगळ्या उपचारांची शिफारस आरोग्य नियामकांनी केली.

काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेत ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’च्या लसीला मंजुरी देण्यात आली होती. ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’च्या लसीची चाचणी तीन खंडांमध्ये करण्यात आली होती. अमेरिकेत गंभीर आजाराविरोधात ८५.९ टक्के, दक्षिण आफ्रिकेत ८१.७ टक्के आणि ब्राझीलमध्ये ८७.६ टक्के ही लस सुरक्षित असल्याचे आढळून आली होती. दरम्यान याबाबत ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ने प्रतिक्रिया व्यक्त केली असून लसीचा आणि रक्ताच्या गाठीचा थेट संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणी प्राधिकरणांशी संपर्कात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.