उद्या रात्री 8 वाजेपासून राज्यात 144 कलम लागू, पुढचे 15 दिवस संचारबंदी : मुख्यमंत्री


मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच याच पार्श्वूभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहेत. उद्या रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. कुणालाही आवश्यक कामाशिवाय बाहेर फिरता येणार नाही. ही संचारबंदी पुढील 15 दिवसांसाठी लागू असणार आहे. पण त्याच दरम्यान मंगळवेढा-पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत असल्यामुळे मतदान झाल्यावर निर्बंध लागू होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संचारबंदीच्या काळात आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील. जनावरांचे दवाखाने सुरु राहतील. पावसाळी पूर्व कामे सर्व सूरू राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ऑक्सिजनची मोठी कमतरता राज्यात आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी वाहतुकीत मोठा वेळ जात आहे. त्यासाठी लष्कराच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा हवाई मार्गाने करण्यात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार असून इतर राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठीही पंतप्रधानांना विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाच्या सद्यस्थितीमुळे वैद्यकीय सुविधेवर भार पडत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. सध्याची स्थिती नियंत्रणात आली नाही तर स्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे.