RRRच्या टीमने नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत शेअर केले नवीन पोस्टर


भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात बिग बजेट चित्रपट असलेल्या ‘रौद्रम रणम रुधिरम’ म्हणजेच ‘RRR’. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी उगाडीच्या निमित्ताने चित्रपटाचे एक नवीन पोस्टर रिलीज केले आहे. ‘आरआरआर’च्या टीमने हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. शेअर करताच प्रेक्षकांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘RRR’च्या टीमने चित्रपटाचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित केले आहे. ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण या पोस्टरमध्ये दिसत आहेत. हे पोस्टर पाहिल्यानंतर, एखाद्या उत्सवातील किंवा चित्रपटातील कोणत्या गाण्यातील हा फोटो असल्याचे दिसते. ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण दोघे ही यात आनंदात असल्याचे दिसत आहे. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा…अशा आशयाचे कॅप्शन या पोस्टरला त्यांनी दिले आहे. पोस्टर शेअर करताच ४८ हजार पेक्षा जास्त लोकांनी याला लाइक केले आहे.

एस.एस. राजमौली या चित्रपटाचे दिग्दर्शक असून या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर हा कोमराम भीम ही भूमिका साकारत आहे. तर राम चरण हा अल्लुरी सिताराम राजू ही भूमिका साकारत आहे. या दोघांच्या व्यतिरिक्त आलिया भट्ट, अजय देवगन, समुथीराकिनी, ऑलिव्हिया मॉरिस असे अनेक कलाकार यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १० भाषांमध्ये १३ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.