मृत्यूदर कमी करण्यात रेमडेसिवीरची मदत होत नाही – जागतिक आरोग्य संघटना


नवी दिल्ली – रेमडेसिवीर इंजेक्शनचा महाराष्ट्रासह इतर काही राज्यात तुटवडा जाणवत असल्यामुळे रेमडेसिवीर मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे सध्या चित्र आहे. एकीकडे रेमडेसिवीरची मागणी प्रचंड वाढलेली असताना या इंजेक्शनबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाची माहिती दिली आहे. रेमडेसिवीर कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोमया स्वामिनाथन आणि डॉ. मारिया वॅन केरखोव यांनी दिली आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या पाच चाचण्यांमधून हेच समोर आले आहे की कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आणि रुग्णांच्या व्हेंटिलेशनमध्ये घट करण्यात रेमडेसिवीरच्या वापरामुळे कोणतीही मदत होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाच वैद्यकीय चाचण्या रेमडेसिवीरच्या उपयुक्तेबाबत करण्यात आल्या. डॉ. स्वामिनाथन या चाचण्याच्या पुराव्याचा संदर्भ देत म्हणाले, पाच वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यातून हाती आलेल्या पुराव्या आधारे असे दिसून आले की, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला रेमडेसिवीर दिल्यानंतर त्यामुळे मृत्यूदरात घट झाली नाही. ना रुग्णांच्या रुग्णालयात उपचार करण्याच्या कालावधी घट झाली. तसेच आजारांवरही रेमडेसिवीर परिणामकारक असल्याचे दिसून आले नसल्याची माहिती त्यांनी दिली.

सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर रेमडेसिवीरच्या उपचाराबद्दल आम्ही सशर्त शिफारस केली आहे. पुराव्यांचा अभाव असला, तरी रुग्णांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होते. पण, सध्या रेमडेसिवीरच्या वैद्यकीय चाचण्या सुरू असून, त्याच्यावर आमचे लक्ष्य असल्याचे डॉ. मारिया म्हणाल्या. रेमडेसिवीरच्या सुधारित डेटावर आमचे लक्ष असून, त्याचा वापर रेमडेसिवीरबद्दलची मार्गदर्शक तत्वे अपडेट करण्यासाठी केला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.