जळगावात कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये निम्याने घट, कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ


जळगाव : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अजूनच गहिरे होत असताना महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात मागील आठवडाभराचा विचार करता कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक घट होत असल्यामुळे आणि बाधित होणाऱ्या एवढेच रुग्ण बरे होऊन परत जात असल्यामुळे प्रशासन आणि जनतेच्या दृष्टीने मोठा दिलासा देणारी बातमी ठरली आहे.

तत्पूर्वी कोरोनाबाधितांच्या संख्येने जिल्ह्यात लाखांचा आकडा पार केला आहे, तर सतराशेच्या पुढे रुग्ण हे कोरोनामुळे मृत्यू पावले आहे. असे असताना कोरोनाच्या वेगाने आलेल्या दुसऱ्या साथीने प्रशासनाच्या आणि जनतेच्या मनात चांगलीच भीती निर्माण केल्याचे पाहायला मिळत होते.

कोरोनाच्या बाबतीत सुरुवातीपासून जळगाव जिल्हा हा हॉटस्पॉट ठरला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तर मृत्यूदर हा तेरा टक्क्यापर्यंत एवढा जाऊन पोहोचला असल्याने केवळ देश पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर देखील जळगाव चर्चेचा विषय बनले होते. त्यानंतर मात्र प्रशासनाने सर्वच पातळीवर प्रयत्न करून मृत्यूदर कमी करण्यात यश मिळविल्यामुळे प्रशासन आणि जनतेत काहीशी बेफिकिरी आल्याचे समोर आले होते. त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या लाटेचे रूपांतर केव्हा समूह संसर्गात झाले हे कोणालाही कळले नव्हते.

जळगाव जिल्ह्याचा सध्या विचार केला तर कोरोनाची दुसरी लाट ही उच्च पातळीवर असल्याचे पाहायला मिळत असल्याने आणि रोज साधारणपणे बाराशे नवे रुग्ण आणि पंधरा बधितांचा मृत्यू असे समीकरण बनल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसून येत होते. पण, जर गेल्या आठवड्याचा विचार केला तर दिवसागणिक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता काही प्रमाणात कमी होत असल्याचे समोर आल्याने जळगावकरांच्या दृष्टीने दिलासा देणारी बातमी आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून अकराशे ते बाराशे नवीन कोरोनाबाधित रुग्ण समोर येत असले तरी त्यात बाधित होण्याच्या प्रमाणात घट झाल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. मागच्या महिन्यात बाराशे कोरोनाबाधित हे पाच ते सहा हजार चाचण्यांमध्ये येत होते. तेवढेच नवीन कोरोनाबाधित आता आठ ते दहा हजार चाचण्यांत येत असल्याने बाधित होण्याचा दर हा वीस टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर आला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणपण जवळपास तेवढेच असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीने दिलासा देणारी बातमी ठरली आहे. अजूनही पुढील काही काळात दुसऱ्या लाटेचा जोर ओसरला जाईल, अशी शक्यताही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केली आहे.