पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई


कोलकाता – सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून येथे सध्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने केंद्रीय निमलष्करी दलांबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी आणि धार्मिक अभिनिवेश असलेली वक्तव्ये केल्याबद्दल २४ तासांसाठी प्रचारबंदी लागू केल्यानंतर आता भाजप नेत्यावरही निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने भाजप नेते राहुल सिन्हा यांच्यावर कारवाई केली असून ४८ तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली आहे. याचा अर्थ राहुल सिन्हा पुढील ४८ तास प्रचार करु शकणार नाहीत.

बिहारमधील सीतलकूची येथे चार नाही तर आठ लोकांना ठार करायला हवे होते, असे वक्तव्य भाजप नेते राहुल सिन्हा यांनी केले होते. त्यांच्यावर याप्रकरणी निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना नोटीस पाठवली आहे.

आज संध्याकाळी निवडणूक आयोगाने घातलेली प्रचारबंदी सुरु होत असून १५ एप्रिलला दुपारी १२ वाजेपर्यंत कायम असेल. सीतलकूची येथील हिंसाचारात पाच लोकांनी आपला जीव गमावला होता. यामध्ये चार जणांना केंद्रीय दलाकडून गोळ्या घालण्यात आल्या होत्या. राहुल सिन्हा यांनी यावर बोलताना चार नाही तर आठ जणांना गोळ्या घालायला हव्या होत्या, असे म्हटले होते.

दुसरीकडे निवडणूक आयोगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनाही नोटीस पाठवली असून बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाला तर अशा घटना होत राहतील, असे दिलीप घोष यांनी म्हटले होते.