राज्यातील जनतेला आज पुन्हा संबोधित करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई : आज (मंगळवार) पुन्हा एकदा राज्यातील जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संबोधित करणार आहेत. ते आपले म्हणणे रात्री आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर मांडणार आहेत. मुख्यमंत्री यावेळी नेमक्या काय घोषणा करणार? याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. लॉकडाऊनची घोषणा यावेळी मुख्यमंत्री करणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करणं हाच पर्याय असल्याचे सांगितले होते. बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आठ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन लावण्याच्या बाजूने मुख्यमंत्री ठाकरे हे आहेत. तर कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर राज्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा, असे कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांचे मत आहे.

राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकार महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचलं आहे. दरम्यान लॉकडाऊनची जनतेने मानसिकता ठेवावी, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते.