महाबिलंदर चोरटा धनीराम मित्तल ची सुरस कथा

जगभरात चोरट्यांची अजिबात कमतरता नाही. अनेक चोर तर अति हुशार असतात. भारतात असाच एक महाबिलंदर आणि चतुर चोरटा आहे ज्याचे नाव आहे धनीराम मित्तल. संपूर्ण देशात तो प्रसिध्द आहे त्याच्या डोकेबाजपणामुळे. तो इतका बिलंदर आहे की काही काळापूर्वी त्याने चक्क दोन महिने न्यायालयात न्यायाधीश बनून हजारो निकाल दिले होते आणि ही बाब उघडकीस येण्याअगोदर तो फरारी झाला होता. आजही तो कुठे आहे याचा पत्ता पोलिसांना लागलेला नाही.

धनीरामने २५ व्या वर्षीच चोरी हेच करियर करायचा निर्णय घेतला होता. आज तो ८१ वर्षाचा आहे. १९६४ मध्ये तो प्रथम चोरी करताना पकडला गेला. देशातील चोरी इतिहासात धनीराम सर्वाधिक वेळा अटक झालेला नामवंत चोरटा आहे. २०१६ मध्ये तो शेवटचा पकडला गेला होता. पण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात तो यशस्वी ठरला. आत्तापर्यंत त्याने १ हजारापेक्षा जास्त वाहने चोरली आहेत. विशेष म्हणजे तो दिवसाढवळ्याच चोरी करत असे.

त्याची एक कथा अशी सांगितली जाते की त्याला एकदा अटक करून न्यायालयापुढे नेले. त्या न्यायाधीशांनी धनीरामला अनेकदा त्यांच्या कोर्टात पहिल्याने चिडून त्यांनी धनीरामला बाहेर जा असे सुनावले. धनीराम लगेच उठला, त्याच्याबरोबरचे पोलीसही उठले. धनीराम पोलिसांना म्हणाला जजनी मला जायला सांगितले आहे आणि तो सरळ निघून गेला. पोलिसांच्या काही लक्षात येईपर्यंत तो गायब झाला होता.

धनीरामने एलएलबी केले आहे आणि त्याने हस्ताक्षर तज्ञ आणि ग्राफोलॉजि मध्ये सुद्धा पदवी मिळविली आहे असे सांगितले जाते. त्याचा वापर तो बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी आणि त्यानुसार चोरीच्या गाड्या विकण्यासाठी करत असे. एकदा त्याने हरियाना झज्जर कोर्टातील अतिरिक्त सेशन जज्ज याना अशीच बनावट कागदपत्रे बनवून दोन महिन्यांच्या सुटीवर पाठविले आणि त्यांच्या जागी स्वतः जज्ज म्हणून काम केले. या काळात त्याने २ हजाराहून अधिक  गुन्हेगारांना जामीन दिला आणि काहीना तुरुंगात पाठविले. पण खरा प्रकार उघडकीला येईपर्यंत धनीराम अदृश्य झाला होता. शेवटी ज्यांना जामीन दिला गेला होता त्यांना परत पकडून तुरुंगात टाकले गेले होते.