ही मायक्रोचीप करोना होण्याअगोदरच देईल सूचना!

अमेरिकेच्या संरक्षण संस्थेने म्हणजे पेंटागॉनच्या च्या डिफेन्स अँड अॅडव्हांस रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीने अशी मायक्रोचीप तयार केली आहे जिच्यामुळे करोना होण्याअगोदरच संबंधित व्यक्तीला त्याची सूचना मिळू शकणार आहे. द सनने दिलेल्या वृत्तानुसार ही मायक्रोचीप व्यक्तीच्या त्वचेत बसविली जाते आणि ती करोना व्हायरसचा शोध घेणे, त्याचे संक्रमण रोखण्यात महत्वाची भूमिका बजावते. यामुळे करोनाचा फैलाव रोखणे शक्य होईल असा दावा संस्थेतील वैज्ञानिक करत आहेत.

खोकला, ताप, सर्दी, वास न येणे, चव जाणे ही करोनाची सर्वसामान्य लक्षणे आहेत. काही केसेस मध्ये डोकेदुखी, थकवा येणे अशीही लक्षणे दिसतात. काही केसेस मध्ये कोणतेही लक्षण दिसत नाही मात्र तरीही त्या माणसाला करोना होतो. ज्यांना लक्षणे दिसत नाहीत त्यांच्यापासून करोनाचा संसर्ग दुसऱ्यांना होऊ शकतो. हा धोका या चीप मुळे टाळता येणार आहे.

अमेरिकी सेना संसर्गजन्य रोग तज्ञ मॅट हेपबर्न सांगतात, ही चीप टिश्यू प्रमाणे एक जेल आहे. शरीरात त्वचेखाली ती फिट करता येते. त्या नंतर ही चीप सतत रक्त टेस्ट करून त्यात काही रासायनिक बदल होत आहेत का यावर लक्ष ठेवते आणि जेव्हा असे बदल सुरु होतात तेव्हा ताबडतोब संबंधित व्यक्तीला अॅलर्ट करते. परिणामी करोना होण्याअगोदर व्यक्तीला थोडा वेळ मिळू शकतो. आणि त्वरित उपचार सुरु करता येतात. शिवाय या व्यक्तीपासून दुसऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका राहत नाही असा दावा केला जात आहे.