अखेर चिन्यांनी दिली कबुली; आमची लस कोरोनावर कमी प्रभावी


बीजिंग : फायझर आणि बायोएनटेक व्हॅक्सिन कोरोनावर प्रभावी नसून आमच्या लस प्रभावी असल्याचा बडेजावपणा करणाऱ्या चीनने अखेर आमची लस कोरोनावर कमी प्रभावी असल्याची कबुली दिली आहे. यासंदर्भातील वृत्त द न्यूज मिनटने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ही कबुली चीनच्या रोग नियंत्रण केंद्राचे संचालक गाओ फू यांनी दिली आहे.

कोरोनापासून संरक्षण करण्यासाठीची क्षमता चायनिज व्हॅक्सिनमध्ये फार जास्त नाही. त्यासाठी आम्ही दोन किंवा अधिक लस एकत्र करून त्यांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करत असल्याचे देखील गाओ फू यांनी स्पष्ट केले आहे. ब्राझील, तुर्की, हंगेरी, इंडोनेशिया, मेक्सिको अशा देशांना चीनकडून आत्तापर्यंत चायनिज व्हॅक्सिनचे लाखो डोस पुरवले आहेत.

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याची क्षमता चीनमध्ये बनवण्यात आलेल्या सिनोवॅक लसीची ब्राझीलमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनात ५०.४ टक्के एवढी आली आहे. जागतिक स्तरावरील संशोधकांच्या मते लस प्रभावी ठरण्यासाठी ती ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी असायला हवी. त्याचवेळी फायझर-बायोएनटेक लस बचावाची क्षमता तब्बल ९७ टक्के एवढी नोंदवण्यात आली आहे. सध्या चीनमध्ये आणि चीनने व्हॅक्सिन निर्यात केलेल्या इतर देशांमध्ये सिनेवॅक आणि सिनोफार्म या कंपन्यांनी बनवलेल्या लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.

दरम्यान, हा दावा स्वीकारण्यास चायनिज लस बनवणाऱ्या सिनोवॅक कंपनीने नकार दिला आहे. लस प्रभावी ठरण्याची क्षमता कमी-जास्त होऊ शकते. पण हे अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांचे वय, संबंधित व्हायरसचा स्ट्रेन आणि इतर घटकांवर अवलंबून असल्याची प्रतिक्रिया सिनोवॅकचे प्रवक्ते लियु पैचेंग यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, चीनने अजूनपर्यंत कोणत्याही इतर लसीला देशात लसीकरणाची परवानगी दिलेली नाही.