सुशील चंद्रा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त


नवी दिल्ली – सुशील चंद्रा हे देशाचे नवनियुक्त निवडणूक आयुक्त होणार असून ते सध्या निवडणूक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. मंगळवारपासून या पदाची ते जबाबदारी सांभाळणार आहेत. सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्तांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्याच्या परंपरेनुसार सुशील चंद्रा हे नवे मुख्य निवडणूक आयुक्त होणार आहेत. चंद्रा हे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्यासह निवडणूक आयोगाचे कामकाज पाहणार आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्ये होणाऱ्या निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

केंद्र सरकारकडून सुशील चंद्रा यांच्या नावावरही शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी चंद्रा यांना निवडणूक आयुक्त करण्यात आले होते. दरम्यान विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा सेवानिवृत्त होत असल्यामुळे ते १३ एप्रिल रोजी पदभार स्वीकारतील. सुशील चंद्रा हे १४ मे २०२२ पर्यंत या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. निवडणूक आयोगात येण्यापूर्वी ते केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष होते.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभेच्या निवडणुका नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वात पुढील वर्षी मार्चमध्ये होणार आहेत. उत्तरप्रदेश वगळता उर्वरित विधानसभा निवडणुकांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपणार आहे, तर उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ १४ मे रोजी संपणार आहे.