मुंबई महानगरपालिका कोविड सेंटरसाठी पंचतारांकित हॉटेल्स घेणार ताब्यात


मुंबई: राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन लावण्याच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत युद्धपातळीवर तयारी सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खास रणनीती महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आखली आहे. साधारण गुढीपाडव्याच्यानंतर लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबईत हा अ‍ॅक्शन प्लॅन अंमलात आणला जाणार आहे.

मुंबई महानगरपालिका त्यासाठी शहरातील पंचतारिकांत हॉटेल्स ताब्यात घेणार आहे. कोविड सेंटरमध्ये या हॉटेल्सचे रुपांतर करण्यात येईल. याचा वापर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी केला जाईल. तसेच या सगळ्या कामांवर देरखेख ठेवण्यासाठी मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

अशा प्रकारे असेल मुंबई महानरपालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन

  • नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये वॉर रूमसाठी आणि जम्बो फिल्ड रुग्णालयांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येणार. दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत हे नोडल अधिकारी काम पाहतील.
  • वॉर रूमचे नोडल अधिकारी आणि जम्बो कोविड सेंटरचे अधिकारी एकामेकांच्या सतत संपर्कात राहणार आहेत.
  • सर्व कोरोना चाचणी करणाऱ्या लॅब्सना रिपोर्ट देण्यासाठी मिळणार 24 तासाचा अवधी देण्यात येईल. सर्वांत आधी लक्षण असलेल्या कोरोना रूग्णांचा रिपोर्ट द्यावा लागणार.
  • कोविड केअर सेंटरमध्ये काही पंचताराकित हॉटेल्सचे रुपांतर करण्यात येणार. ही केंद्र चालवण्याची जबाबदारी खासगी डॉक्टरांकडे निश्चित करण्यात येणार.
  • विशेषत: रात्री 11 ते सकाळी 7 दरम्यान सर्व खाटांचे वाटप प्रामुख्याने फक्त जंबो फिल्ड हॉस्पिटलमध्ये आणि वॉर्ड वॉर रूम्स आणि अनुक्रमे नोडल अधिकाऱ्यांकडून रात्री संपूर्ण फास्ट ट्रॅक बेड वाटप केले जातील.
  • कोरोना रुग्णांसाठी बेडस कमी पडत असल्याने विभागीय आयुक्तांना मुंबईच्या 24 वॉर्डसमध्ये काही हॉटेल्स ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून रुग्णालये आणि कोविड सेंटरमधील बेडस संपल्यास या हॉटेल्सचा वापर करता येईल.
  • आणखी 325 आयसीयू बेडस मुंबईत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच नोडल अधिकारी खासगी रुग्णालयांमध्ये काही पेशंटस विनाकारण आयसीयू किंवा ऑक्सिजन बेडस अडवून ठेवत आहेत का, याचाही आढावा घेतील. जेणेकरून गंभीर अवस्थेतील रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येणार नाहीत.