लॉकडाऊनसंदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक


मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज होणारी वाढ पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सतत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय घेऊ शकतात. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. दरम्यान राज्य सरकारने गेल्या आठवड्यात कडक निर्बंध जाहीर केले होते. ज्यात वीकेंड लॉकडाऊन, रात्रीचा कर्फ्यू आणि दिवसा जमावबंदी यांसारख्या आदेशांचा समावेश होता. पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध 30 एप्रिलपर्यंत सुरू राहतील.

दरम्यान लॉकडाऊनचा निर्णय 14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये होणार असल्याची माहिती टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्रीच करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या ऑनलाईन बैठकीत लॉकडाऊन लागू करण्यासह विविध विषयांवर चर्चा झाली.

या बैठकीत लॉकडाऊनला कसे सामोर जायचे, याबाबत चर्चा झाली. राज्यात लॉकडाऊन लावायचा झाला तर प्रत्येक विभागाची तयारी, पुढील गणिते आणि आर्थिक बाजूची माहिती घेणार, टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनची दाहकता किती ठेवायची? यावर चर्चा झाली. कोरोनाबाधितांची संख्या जिकडे जास्त असेल तिकडे कडक लॉकडाऊन गरजेचे, जास्त कडक लॉकडाऊन लावले तर सामान्य जनतेचे हालही नाही झाले पाहिजे यावर चर्चा झाली. लॉकडाऊन करायचे तर किती दिवसाचे करायचे? राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि कर्मचारी याचे नियोजन किती पटीने आणि कसे वाढवले गेले पाहिजे? यावरही बैठकीत चर्चा झाली.