महाराष्ट्रात लोकशाही नव्हे तर लॉकशाही सुरू आहे; प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस कडाडले


पंढरपूर – पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात या निवडणुकीत थेट लढत होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी पंढरपूर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यात कोणाला यश मिळणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

परंतु सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या निवडणुकीच्या प्रचारसभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान निवडणूक प्रचार सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, जनतेसाठी पंढरपूर पोटनिवडणूक ही एक संधी आहे. लोकहितविरोधी सरकारविरोधात मतदान करा. हे महाविकास आघाडी सरकार नाही तर महावसुली सरकार आहे. हे सरकार पोलिसांकडून, शेतकऱ्यांकडून, जनतेकडून वसुली करण्यासाठी काम करत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, देशात जेवढे मृत्यू होत आहेत त्यातील ५० टक्के मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत. या महाविकास आघाडी सरकारने ही अवस्था करून ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर महाराष्ट्रात लोकशाही नव्हे तर लॉकशाही सुरू आहे. हे आवश्यक असले तरी जेव्हा लॉकडाऊन करतो, तेव्हा जे लोक रोजंदारीवर जगतात. अशा सामान्य माणसांना मदत करण्यासाठी तिजोरीत हात घातला पाहिजे. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचे भान सरकारला नाही. सरकारला मायबाप का म्हणतो कारण त्यांनी अडचणीत असलेल्या मुलांना मदत केली पाहिजे. सरकारने मदत केलीच नाही, पण वीजबिलाची वसुली मुघलांप्रमाणे केली असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

दरम्यान, जर पंढरपूर मतदारसंघात १७ तारखेनंतर वीज कनेक्शन कापले नाही, तर माझे नाव बदलून टाका. भाजपने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गदारोळ केल्यानंतर वीज कनेक्शन कापणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर शेवटच्या दिवशी वीज कनेक्शन कापण्यावरील स्थगिती उठवली. हे सरकार लबाड असून बिल्डरांना ५ हजार कोटींची सूट सरकारने दिली परंतु शेतकऱ्यांकडून ५ हजार कोटींची वसुली सरकारने केली. अजितदादा खूप काही बोलतील पण हे लबाडांचे अवसान घेत आहेत. एक नवा पैसा या सरकारने पंढरपूरला दिला नाही. भाजप सरकारच्या काळात दुप्पटीने सोलापूर जिल्ह्याला पैसा दिला, असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी प्रचारसभेत केला.