कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाहीच


नागपूर: राज्यातील कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता मे अखेरीपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती राहील, असे मत तज्ज्ञांनी मांडल्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्यायच नसल्याचे सांगतानाच माणसे मरत असताना उत्सव कशाला साजरे करत आहात, असा सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

वीकेंड लॉकडाऊन नंतरही राज्यभर आज गर्दी होत आहे. ही गर्दी अतिशय घातक असल्यामुळे नागरिकांची गर्दी रोखायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. ही परिस्थिती भविष्यात अधिक भयावह होणार आहे. या कोरोनातून वाचायचे असेल तर अजिबात घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन होईल, तेव्हा होईल. पण तुम्ही घराबाहेर पडू नका. जर परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रात मृतदेहांचा खच पडेल, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आठवडाभराचा लॉकडाऊन व्हावा, असे वाटत आहे. परंतु आठ दिवसांच्या लॉकडाऊनने काहीही होणार नाही. कोरोनाची साखळी मोडायची असेल तर किमान 14 दिवसाचा लॉकडाऊन असला पाहिजे. तरच कोरोनाची साखळी तोडता येईल. पण, याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच होईल. लॉकडाऊन करताना कुणाला काय मदत करायची याचा विचार केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार याचा आढावा घेत असून येत्या दोन चार दिवसात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

राज्यात मे अखेर पर्यंत कोरोनाची विस्फोटक परिस्थिती राहिल. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. शंभर टक्के लॉकडाऊन राज्यात होणार असल्याचे सांगतानाच उद्या गुढीपाडवा आहे आणि 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यामुळे 15 एप्रिल रोजी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

काही गोष्टींना लॉकडाऊन करताना सूट देऊन चालणार नाही. याकाळात मुंबईतील लोकलवर निर्बंध लावायचे की नाही, याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे. कॅबिनेटमध्ये त्याबाबत चर्चा होईल. कारण मुंबईतील लोकलची गर्दी थांबवावीच लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाची लस नाही. लसीची लोक प्रतिक्षा करत आहेत. माणसे मरत आहेत. मग लसीकरण उत्सव कशाला? असा सवाल करतानाच कोरोनावर व विजय मिळवल्यानंतर उत्सव करता येईल. त्यासाठी एवढी घाई कशाला?, असा सवालही त्यांनी केला. लॉकडाऊन आणि लसीच्या पुरवठ्याबाबत कुणी राजकारण करू नये. कुणी उपकाराची भाषा करत असेल तर ती पदाशी बेईमानी ठरेल, असेही ते म्हणाले.

बेड्सची राज्यात कमतरता आहे. एका दिवसात बेड्स वाढवता येतील. पण नर्स आणि डॉक्टर कुठून आणणार? नर्स आणि डॉक्टर्स काही आभाळातून पडणार नसल्यामुळे नागरिकांनीच याचा विचार करावा. विनाकारण गर्दी करू नये. ताप अंगावर काढू नये, तात्काळ उपचार घ्यावेत आणि कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.