गुड न्यूज! एलआयसी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार २० टक्के वाढ


नवी दिल्ली: आगामी आठवडाभरात केंद्र सरकार भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाने एलआयसी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी दिली असून, २० टक्क्यांपर्यंत पगारवाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे यंदा एलआयसीच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ निश्चित मानली जात आहे. अर्थ मंत्रालयाकडे एलआयसी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या २० टक्के वेतन वाढीची शिफारस केली असून, येत्या आठवड्यात अंतिम मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. एलआयसीच्या अध्यक्षांची अलीकडेच युनियनच्या प्रतिनिधींशी ऑनलाईन चर्चा झाली. यात व्यवस्थापनाने दिलेल्या वेतन वाढीच्या प्रस्तवाची माहिती दिली.

१७ टक्के वेतन वाढीचा प्रस्ताव मागील वेळी देण्यात आला होता. याशिवाय गृहकर्जावर १ टक्का कपातीचा प्रस्ताव देण्यात आला होता. यंदा एलआयसी कर्मचाऱ्यांना १८.५ टक्के ते २० टक्क्यांच्या दरम्यान पगारवाढ मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा १ ऑगस्ट २०१७ पासून वेतनवाढ झाली नसल्याची माहिती मिळत आहे.