अक्षय कुमार आणि लिओनार्दो दि कॅप्रिओ गोल्डन ग्लोब ऑनर्स फाऊंडेशनतर्फे सन्मानित


जगभरातील कलाकार, सेलिब्रिटी दीर्घकाळापासून पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी काम करत आहेत. अशा सामाजिक कार्यांमध्ये भारतातील देखील काही आघाडीचे कलाकार सहभागी आहेत, अनेकजण पुढाकार घेत आहेत. अभिनेता अक्षय कुमार हा त्यापैकीच एक असून. त्याला त्याच्या कार्यासाठी एक मानाचा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

अभिनेता अक्षय कुमारला पर्यावरणासंबंधित कामासाठी गोल्डन ग्लोब ऑनर्स फाऊंडेशनतर्फे सन्मानित करण्यात आले आहे. त्याच्यासोबत हॉलिवूड अभिनेता लिओनार्दो दि कॅप्रिओ यालाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील स्वच्छतेच्या प्रश्नाबद्दल अक्षय कुमार सतत काम करत असतो. लोकांना प्रोत्साहन देत, त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्याचे काम करत असतो. तर जैवविविधतेच्या सुरक्षेसाठी, महासागर आणि जंगलांच्या संवर्धनासाठी तसेच हवामान बदलाच्या प्रश्नावर लिओनार्दो दि कॅप्रिओ काम करत आहे. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर या यादीत अभिनेत्री एमा वॅटसन आणि सारा मार्गारेट क्वाले यांचाही समावेश आहे.

बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी काही ना काही सामाजिक काम करत आहेत. पर्यावरणासंदर्भात युनिसेफ या संघटनेची दिया मिर्झा ब्रँड अम्बॅसिडर आहे, तर पर्यावरणपूरक उर्जानिर्मितीच्या क्षेत्रात अजय देवगण काम करत आहे. अमिताभ आणि अभिषेक बच्चनही हवामान बदलाच्या संदर्भात काम करत आहेत.