देशात काल दिवसभरात आढळले १,६८,९१२ पॉझिटिव्ह रुग्ण


मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने होत असल्यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशभरात मागील २४ तासांत कोरोनाबाधितांची वाढ नव्या शिखरावर पोहोचली आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनची ही उच्चांकी वाढ असून, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही २४ तासांत वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे सरकार आणि आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी आहे.

गेल्या २४ तासांत झालेली रुग्णवाढ आणि मृत्यूची संख्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. रविवारी नोंदवण्यात आलेली ही रुग्णसंख्या आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. २४ तासांत १ लाख ६८ हजार ९१२ कोरोना बाधित आढळून आले असून, याच कालावधीत देशात ९०४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ हजार ८६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्याही १ लाख ७० १७९ एवढी झाली असून, एकूण रुग्णसंख्या १,३५,२७,७१७ वर पोहोचली आहे.

कोरोनाची पहिली लाट सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर ओसरली होती. फेब्रुवारीपर्यंत देशात दिवसाला १० हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. पण, कोरोनाचा अचानक उद्रेक झाल्यानंतर एका महिन्यातच देशात दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णसंख्या लाखांच्या घरात पोहोचली होती. एप्रिलमध्ये देशात दररोज एका लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मागील तीन दिवसांपासून देशात सलग दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णवाढ नोंदवली गेली आहे.