स्वतः डिझाईन केलेल्या लँड रोव्हरमधून होणार प्रिन्स फिलीप यांचा अंतिम प्रवास

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांच्यावर शनिवारी दुपारी दक्षिण पूर्व इंग्लंड मधील विंडसर पॅलेस मध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. १५ वर्षांपूर्वी प्रिन्स फिलीप यांनी ज्या लँड रोव्हरच्या डिझाईन मध्ये मदत केली होती तिच्यामधून प्रिन्स फिलीप यांचा अंतिम प्रवास होणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावेळी फक्त ३० जणांना अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहता येणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी त्यांची जागा शाही परिवारातील सदस्यासाठी उपलब्ध व्हावी म्हणून अंत्यसंस्कारात सामील होणार नसल्याचे कळविले आहे.

ब्रिटीश राजपरिवाराचे निवासस्थान बकिंहम पॅलेस मधून दिल्या गेलेल्या माहितीनुसार प्रिन्स फिलीप यांनी ब्रिटीश लग्झरी कार निर्माती जग्वार लँडरोव्हरची गाडी १५ वर्षापूर्वी डिझाईन मध्ये काही बदल करून घेतली होती. डिझाईन मधील बदल प्रिन्स फिलीप यांनी सुचविले होते आणि २००५ पासून ही गाडी त्याच्या वापरात होती. त्यानंतर ३ वर्षांनी जग्वार लँड रोव्हरचे टाटा मोटर्सने अधिग्रहण केले होते.

प्रिन्स फिलीप यांचा अंतिम प्रवास या गाडीतून होणार असून त्याची शवपेटी या गाडीवर ठेवली जाणार आहे. अंत्यसंस्कार फिलीप यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण टीव्ही वरून केले जाणार आहे. या कार्यक्रमात राजपरिवारातील ३० लोक सामील होणार आहेत. इतर वेळी अश्या कार्यक्रमात ८०० लोक सामील होतात पण करोना मुळे या संख्येवर मर्यादा आली आहे.