चंद्रावर जमीन खरेदी करणारा भारतातला पहिला व्यापारी

मुलीच्या जन्मामुळे आनंद झालेल्या एका व्यापाऱ्याने आपल्या दोन महिन्याच्या नवजात मुलीसाठी गिफ्ट म्हणून चंद्रावर एक एकर जमीन मुलीच्या नावाने खरेदी केली आहे. सुरत मधील काच व्यापारी विजय कथेरिया असे या व्यापाऱ्याचे नाव असून त्यांच्या लेकीचे नाव आहे नित्या. चंद्रावर जमीन खरेदी करणारे विजय जसे पाहिले व्यापारी ठरले आहेत तसेच इतक्या लहान वयात चंद्रावर मालकीची जमीन असणारी नित्या पहिली बालिका ठरली आहे.

सुरतच्या सरडाना भागात विजय राहतात. त्यांनी चंद्रावर जमीन खरेदीसाठी न्युयॉर्क इंटरनॅशनल लुनार अँड रजिस्ट्री कंपनीकडे ईमेल वरून अर्ज केला होता. १३ मार्च रोजी त्यांनी केलेल्या या अर्जावर सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाली असून चंद्रावर एक एकर जमिनीच्या मालकीची कागदपत्रे त्यांना मिळाली आहेत.

चंद्रावर कुणीही जमीन खरेदी करू शकतो. तेथे वेगवेगळया अंतराळवीरांच्या नावावर प्लॉट असून ही जमीन खरेदी करण्यासाठी अनेक वेबसाईट आहेत. भूमी इंटरनॅशनल लुनार रजिस्ट्रीची अधिकृत वेबसाईट lunarregistry.com , lunarindia. Com अशी आहे. चंद्रावरील भागांना वेगवेगळी नावे असून बे ऑफ रँबॉ, सी ऑफ वेपोर्स, लेक ऑफ ड्रीम, सी ऑफ क्लाउड अशी त्यांची नावे आहेत. एक एकर जमिनीसाठी ३० ते ४० डॉलर्स म्हणजे साधारण अडीच हजार रुपये खर्च येतो.