गुगल मॅप मुळे दुसऱ्याच विवाहस्थळी पोहोचली वरात

एखाद्या ठिकाणाची आपल्याला माहिती नसेल, पत्ता सापडत नसेल तर गुगल मॅप हा मोठाच आधार आहे. पण कधी कधी गुगल मॅप मुळे अनेकांची फसगत झाल्याच्या कथाही ऐकायला मिळतात. इंडोनेशिया मध्ये गुगल मॅप मुळे भलत्याच वधू घरी येण्याची पाळी एका नवरदेवावर आली पण कुटुंबातील एका चाणाक्ष व्यक्तीमुळे पुढचा धोका टळला.

त्याचे झाले असे की, या वऱ्हाडाला जावा लोसरी गावात वधू घरी विवाहासाठी जायचे होते. पण गुगल मॅप मधील माहितीनुसार गेल्याने ही वरात जेंगकोल येथे पोहोचली. योगायोग असा की या गावात सुद्धा एका घरी लग्न होते आणि वधू पक्ष वरातीची वाट पाहत होता. येथे मारिया अल्फा आणि बुरहान सिद्दिकी यांचा विवाह होणार होता. पण भलतीच वरात दारात आली. सुरवातीला काहीच न समजल्याने वधू पक्षाने या वऱ्हाडाचे स्वागत केले, चहा फराळ दिला, एकमेकांना गिफ्ट दिल्या गेल्या पण तेव्हड्यात वधू पक्षाकडील एका माणसाला नियोजित वर हा नाही असे लक्षात आले.

मग सुरु झाली चर्चा आणि खरा प्रकार उघड झाला. गुगल मॅप मुळे चुकीच्या घरी आल्याचे वर पक्षाच्या लक्षात आले आणि त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. एकमेकांना दिलेल्या गिफ्ट परत घेतल्या गेल्या. मारियाच्या कुटुंबाने त्याच्या नियोजित वर पक्षाकडे संपर्क साधला तेव्हा ही वरात काही कारणाने रस्त्यात थांबली आणि म्हणून त्यांना उशीर झाल्याचा उलगडा झाला. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात हसत हसत चुकीच्या घरातून बाहेर पडणारे वऱ्हाडी दिसत आहेत.