सोशल मीडियावर ट्रेंड होतोय ‘इंदिरानगर का गुंडा’

 

शुक्रवारी सायंकाळ पासून इंटरनेटवर ‘इंदिरानगर का गुंडा’ ट्रेंड होत आहे. मात्र हा गुंडा लोकांना फारच भावला असून हा गुंडा दुसरा तिसरा कुणी नसून आपला क्रिकेट मधला ‘द वॉल’ राहुल द्रविड आहे. टीम इंडियाचा माजी कप्तान राहुल द्रविडची एक जाहिरात सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनली आहे. यात राहुलचे दर्शन त्याच्या नेहमीच्या वर्तणुकीच्या पार उलटे आहे. या जाहिरातीत राहुल द्रविड रागाने तोडफोड करताना, जोरजोरात रागावून ओरडताना दिसतो आहे. राहुल द्रविडचे असे रूप प्रेक्षकांनी कधीच पाहिलेले नाही.

क्रेडीट कार्ड बिल पेमेंट कंपनी साठी राहुलने ही जाहिरात केली आहे. या संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात वाहतूक कोंडीत अडकलेला राहुल एका कार मध्ये बसलेला दिसतो आहे. पण वाहतूक कोंडीने त्रासल्याने तो आरडाओरड करताना, लोकांवर वस्तू फेकताना, शेजारी उभ्या असलेल्या कारचा आरसा बॅटने फोडताना दिसतो आहे.

जाहिरातीच्या शेवटी कारच्या सनरुफ मधून बाहेर हातात बॅट घेऊन ओरडून तो इंदिरानगर का गुंड असल्याचे सांगतो आहे. जाहिरात करणाऱ्या कंपनीने राहुल द्रविडची ही नवी ओळख त्याच्या चाहत्यांना करून दिली आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएल नंतर याच जाहिरातीची सर्वाधिक चर्चा होत आहे. ट्विटर वर विराट कोहलीने ही जाहिरात शेअर केली असून त्याला २० लाख व्ह्युज आणि १.६९ लाख लाईक मिळाले आहेत. यावर शेकडो प्रतिक्रियाही दिल्या गेल्या आहेत.