रेमडेसिवीर इंजेक्शन निर्यातीवर भारत सरकारची बंदी

देशात करोना संक्रमणाची वाढ प्रचंड वेगाने होत असल्याचे लक्षात आल्यावर करोना उपचारात वापरले जाणारे रेमडेसीवीर इंजेक्शन निर्यातीवर केंद्र सरकारने रविवारी बंदी घातली आहे. देशात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागल्याने या दोन्हीचा काळाबाजार जोरात सुरु झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने हे इंजेक्शन आणि ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अन्य मालाच्या निर्यातीवर बंदी लागू केली आहे. देशातील करोना परिस्थिती सुधारेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

करोना झालेल्या रुग्णांना रेमडेसीवीर हे अँटी व्हायरल इंजेक्शन दिले जात आहे. हे औषध सहज उपलब्ध व्हावे आणि त्याच्या काळाबाजारावर नियंत्रण आणावे यासाठी ही बंदी घातली गेली आहे. शिवाय आरोग्य मंत्रालयाने सर्व स्थानिक उत्पादकांनी त्यांचे विक्रेते आणि वितरक यांची माहिती वेबसाईटवर प्रकाशित करावी असेही आदेश दिले आहेत. प्रत्येक राज्यातील औषध निरीक्षक व अन्य अधिकारी स्टॉक चेकिंग, साठवणूक आणि काळा बाजार तपास याविरोधात कारवाई करणार आहेत. राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांनी संबंधित राज्ये, केंद्रशासित प्रदेश यांनी औषध निरीक्षकानी केलेल्या समीक्षेची माहिती घ्यायची आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सात कंपन्या रेमडीसीवीरचे उत्पादन करत असून त्याची उत्पादन क्षमता वाढविली गेली आहे. दर महिन्याला ३८.८० लाख कुप्या उत्पादन करण्याची त्यांची क्षमता आहे.