त्वचेचा पोत बिघडण्यासाठी हे पदार्थ असू शकतात कारणीभूत


आपल्याला सगळ्यांनाच, आपली त्वचा अतिशय सुंदर, नितळ, निरोगी असावी असे वाटत असते. त्यासाठी आपण नाना प्रकारचे उपाय ही वेळोवेळी करीत असतो. पण त्वचेची सुंदरता ही आनुवंशिक असते, आणि त्याशिवाय त्वचा नितळ आणि सुंदर ठेवण्यासाठी त्वचेची योग्य निगा राखणे देखील आवश्यक आहे. आपल्या त्वचेचे आरोग्य आणि आपले खानपा यांचा थेट संबंध आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केलेले काही पदार्थ आपल्या त्वचेकरिता हानिकारक ठरू शकतात.

आपल्या आहारातील मिठाच्या जास्त प्रमाणाने आपल्या चेहऱ्यावर, पायांवर सूज येते. आपल्या डोळ्यांच्या आसपासची त्वचा अतिशय नाजूक असते. जर आहारामध्ये मीठ जास्त असेल, तर डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेवर देखील सूज येते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये दररोज ५०० मिलीग्राम पेक्षा अधिक सोडियम ची मात्रा नसावी असे नॅशनल हार्ट अँड ब्लड असोसिएशनचच्या तज्ञांचे मत आहे. त्याचप्रमाणे आपल्या आहारामधील दुध आणि दुग्धजन्य पदार्थ यांच्यामुळे देखील आपल्या त्वचेला नुकसान होऊ शकते. दुधाच्या अतिसेवनाने त्वचेवर मुरुमे पुटकुळ्या, म्हणजेच अॅक्ने होण्याचा संभव असतो. त्यामुळे दुधाचे आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन माफक प्रमाणामध्ये करायला हवे.

साखरेच्या सेवनाने आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त उर्जा तयार होत असते. ह्याला ‘ एम्पटी कॅलरीज ‘ असे ही म्हटले जाते. ह्या अतिरिक्त ऊर्जेमुळे त्वचेवर विपरीत परिणाम होत असतात. साखरेच्या अतिसेवनाने त्वचेवर सुरकुत्या पडणे, डोळ्यांच्या खाली सूज येणे, अॅक्ने, त्वचेवर काळसर डाग दिसून येणे, अश्या तक्रारी उद्भवू शकतात. तज्ञांच्या मते एका दिवसामध्ये पुरुषांनी ३७.५ ग्राम , तर महिलांनी एका दिवसामध्ये २५ ग्राम पेक्षा अधिक अॅडेड शुगर्सचे सेवन करणे टाळायला हवे. त्याचप्रमाणे अति प्रमाणात मद्यपान आणि धूम्रपानाचे देखील त्वचेवर दुष्परिणाम पाहायला मिळतात.

आपल्या आहारामधील ग्लूटेनयुक्त पदार्थांमुळे देखील त्वचेच्या पोतामध्ये फरक पडत असतो. ग्लुटेन युक्त पदार्थांच्या सेवनाने हनुवटीवर अॅक्ने येणे, चेहऱ्यावर सूज येणे आणि त्वचा लालसर दिसणे अश्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये मैदा आणि मैद्याने बनलेले पदार्थ यांचे सेवन माफक प्रमाणामध्ये करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment