राज्यातील कडक लॉकडाऊन संदर्भात आज कोविड टास्क फोर्सची बैठक


मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसारखे कडक पाऊल उचलण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत कालच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले. 15 दिवसांचा लॉकडाऊन राज्यात लावण्याच्या निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकमत नोंदवल्याची माहिती मिळत आहे. त्यातच आता आज कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. लॉकडाऊनच्या निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान लॉकडाऊनसंदर्भात सोमवार किंवा मंगळवारी मोठा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज कोविड टास्क फोर्सची मोठी बैठक पार पडणार आहे. राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय या बैठकीनंतर घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व अधिकारी उपस्थित असणार आहेत. राज्यात जर कडक निर्बंध लागू करायचे असतील, तर ते कसे लागू करता येतील आणि त्याची अंमलबजावणी कशी करता येईल, अशा महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. जरी कडक निर्बंध लादले तरी ते जनतेच्या हितासाठीच असतील, त्यातून जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात येत आहे.

काल (शनिवारी) राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

कडक निर्बंध, थोडी सूट असे चालणार नाही. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही. आज टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर याबद्दल निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. 1 रुग्ण 25 जणांना बाधित करतो, त्यामुळे ही चैन तोडणं गरजेचे आहे. तरुण, लहान मुले कोरोनामुळे बाधित होत आहेत, त्यामुळे एकमुखाने निर्णयाची वेळ आली आहे. यात राजकारण नको. केंद्राकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची मागणी केली आहे. आता लॅाकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. सर्वांनी एकमुखाने निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची गरज असल्याचे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

कोरोनाच्या राज्यातील वाढत्या प्रकोपामुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची शनिवारी सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्वाचा इशारा दिला आहे. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे, नाहीतर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा मुख्य सचिवांनी दिला. मुख्यमंत्र्यांसह सर्वांसमोर यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती संदर्भात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले.