गुढीपाडव्याला डोंबिवलीत होणारी नववर्ष स्वागत यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द


डोंबिवली : राज्यात सर्वच ठिकाणी गुढीपाडव्याला नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. डोंबिवलीमधून याच स्वागत यात्रेची सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. मुळात या गोष्टीसाठीच स्वागतयात्रेचा वसा पुढे नेणारी डोंबिवली जास्त ओळखली जाते. पण, यंदा मात्र उत्सवाच्या उत्साहावर कोरोनाच्या संसर्गाने विरझण टाकले आहे.

दरवर्षी डोंबिवलीमधील प्रसिद्ध श्री.गणेश मंदिर संस्थान यांच्या वतीने स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. पण कोरोनामुळे मागच्या वर्षी या श्रृंखलेमध्ये खंड पडला. त्यावेळी पुढच्या वर्षी नव्या उत्साहात स्वागतयात्रा आयोजित करण्यात येईल, असे सांगण्यातही आले. पण, परिस्थिती काहीशी सुधारत असल्याचे दिसून आले आणि पुन्हा एकदा कोरोनामुळे जीवनाची घडी विस्कटल्यामुळे यंदाच्या वर्षीही डोंबिवली येथील नववर्ष स्वागत यात्रा रद्द करण्यात आली आहे.

यंदाची नववर्ष स्वागत यात्रा कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे रद्द केल्याची माहिती श्री. गणेश मंदीर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी दिली आहे. स्वागत यात्रा रद्द करण्यात आली असली, तरीही मंदिरात धार्मिक कार्यक्रम अंत्यत कमी लोकांच्या उपस्थित आणि कोरोनाचे नियम पाळून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुढीपाडवा फक्त डोंबिवलीच नव्हे, तर राज्यातील अनेक ठिकाणी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. मराठी नववर्षाची सुरुवात करणारा हा सण बहुविध कारणांनी साजरा केला जातो. पण, मागचे वर्ष आणि यंदाचे वर्षही या सणाचा उत्साह सर्वांनाच आवरता घ्यावा लागणार आहे. सध्याच्या घडीला गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा आणि स्वागत यात्रांचे आयोजन होणार नसले तरीही कोरोनाचे नियम पाळत पूजाविधी पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, आता शासनाकडून निर्बंध आणखी कठोर करण्यात आल्यानंतर मात्र नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट होणार आहे.