कथा ‘आग्रा डायमंड’ची

agra
भारतमध्ये प्राचीन काळी अस्तित्वात असलेल्या अनेक राज्यांच्या सत्ताधीशांच्या संग्रही असलेल्या बहुमूल्य रत्नांबद्दल, त्यांच्या रत्नजडित सिंहासनांबद्दल, आणि त्यांच्या वैभवाबद्दल आपण ऐकले असेल, वाचलेही असेल. या सर्व वैभवाचा स्वतःचा असा एक खास इतिहास आहे. यांच्या मागे अनेक कथा आहेत, आख्यायिका आहेत. माता बाबराच्या संग्रही असलेल्या आग्रा डायमंडचा इतिहास मात्र अतिशय रोचक आहे.

अतिबहुमूल्य समजला जाणारा ‘आग्रा डायमंड’ नावाने ओळखला जाणारा हा हिरा सोळाव्या शतकाच्या दरम्यानच्या काळामध्ये ग्वाल्हेर आणि आग्रावर अधिपत्य असणाऱ्या राजा विक्रमजित सिंह तोमर यांच्या संग्रही असल्याचे म्हटले जाते. राजा विक्रमजीत आणि इब्राहीम खान लोधी यांनी बाबराच्या विरुद्ध हातमिळवणी करीत १५२६ साली पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये बाबराच्या सैन्याचा सामना केला. या युद्धामध्ये बाबराचा विजय होऊन, राजा विक्रमजीत आणि इब्राहीम लोधी दोघेही कामी आले.

या युद्धानंतर बाबराने दिल्ली काबीज करून, आपला मुलगा हुमायून याला आग्रा काबीज करण्यासाठी पाठविले. हुमायूनने राजा विक्रमजीतच्या परिवाराला कैदेत घातले, पण जीवे मारले नाही. त्याच्या चांगुलपणाची परतफेड म्हणून राजा विक्रमजीतच्या परिवारजनांनी हुमायूनला एक टपोरा, हलक्या गुलाबी रंगाचा बहुमूल्य हिरा भेट म्हणून दिला. हुमायुनने हा हिरा आपल्या वडिलांना, म्हणजेच बाबराला नजर केला. अश्या रीतीने हा हिरा मुघल खजिन्यामध्ये समाविष्ट झाला, आणि पुढील अनेक दशके मुघल खजिन्याची खासियत बनून राहिला.
agra1
१७३९ साली पर्शियन राज्यकर्ता नादिर शाहने दिल्लीवर आक्रमण करीत मुघलांची पुष्कळ संपत्ती लुटून नेली. याच वेळी कोहिनूर, दर्या-ऐ-नूर, अकबरशाह हे अनेक अति मूल्यवान हिरे लुटून इराणला नेले गेले, मात्र आग्रा डायमंड मुघल खजिन्यामध्ये सुरक्षित राहिला. हा हिरा मुघल खजिन्यामध्ये १८५८ सालापर्यंत सुरक्षित होता. १८५७ सालच्या उठावाच्या वेळी लॉर्ड डोनेगॉल हा आयरिश अधिकारी भारतामध्ये सेवेस असताना आग्रा डायमंड हा मुघल साम्राज्याचे शेवटचे सम्राट बहादूर शाह जफर यांच्या संग्रही होता. १८५७ साली उठावानंतर ब्रिटिशांनी क्रांतिकाऱ्यांचा पाडाव करून जेव्हा पुन्हा दिल्ली ताब्यात घेतली, तेव्हा लाल किल्ला ब्रिटीश सैन्याने पूर्णपणे लुटला. त्या लुटीमध्ये आग्रा डायमंड काही ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या हाती लागला.

युद्धामध्ये एखादी लूट केली गेली, तर ती जशीच्या तशी सरकार दरबारी जमा करावी लागत असे. त्यानुसार या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी बाकीची लूट सरकार दरबारी जमा केली, मात्र बहुमूल्य आग्रा डायमंड त्यांनी स्वतःकडेच ठेऊन घेतला. या हिऱ्याला घोड्याच्या चाऱ्यामध्ये लपेटून हा चार त्यांनी एका घोड्याला खाऊ घातला, आणि हा घोडा इंग्लंडला परत पाठविण्याची व्यवस्था केली. हे अधिकारी देखील घोड्याच्या सोबतच इंग्लंडला रवाना झाले, आणि तिथे पोहोचल्यानंतर या घोड्याला मारून त्यांनी हा हिरा त्याच्या पोटामधून काढून घेतला.
agra2
त्यानंतर सुमारे १८६० पर्यंत हा हिरा नक्की कुठे होता, याचा स्पष्ट उल्लेख नाही. मात्र १८६० मध्ये हा हिरा ब्रुन्सविक चे ड्युक यांच्या खजिन्याचा हिस्सा असल्याचे दिसून आले. ड्युक ऑफ ब्रुन्सविक यांना हिरे आणि बहुमूल्य रत्न जमविण्याचा शौक होता, आणि त्यांचा संग्रह देखील मोठा होता. यांच्या खजिन्याच्या यादीमध्ये इतर चौदा मूळच्या भारतीय रत्नांच्या सोबतच आग्रा डायमंड हा मूळचा बाबराच्या संग्रही असलेल्या हिऱ्याचाही उल्लेख आहे. १८९१ साली हा मूळ ४१ कॅरटचा हिरा कापवून ३२.२४ कॅरटचा करण्यात आला. या दरम्यान हा हिरा अधिक चमकदार बनविण्यासाठी त्याला अनेक नवे ‘कट’ देण्यात येऊन, त्यामध्ये काही ठिकाणी सूक्ष्म काळसर दिसणारे डागही हटविण्यात आले. त्यानंतर हा हिरा ‘विनन’ या अमेरिकन परिवाराला विकला गेला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळी विनन परिवारातील एका महिला सदस्याने आपली सर्व आभूषणे एका लोखंडी पेटीमध्ये बंद करून ही पेटी आपल्या बागेमध्ये पुरून ठेवली होती. त्या आभूषणांच्या सोबत आग्रा डायमंडही या पेटीमध्ये होता. त्यानंतर अनेक दिवस ही पेटी मातीमध्ये पुरलेली होती. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर ही पेटी परत बाहेर काढली गेली. त्यानंतर हा हिरा पुढे निरनिरळ्या व्यक्तींना विकला गेला. तेव्हा हा हिरा कोणाकोणाच्या संग्रही होता याचा स्पष्ट उल्लेख नाही. मात्र १९९० साली या हिऱ्याचा ‘ख्रिस्टीज’ द्वारे लिलाव केला जाऊन, हॉंग कॉंग येथील सिबा कॉर्पोरेशनने हा हिरा तब्बल ६.९ मिलियन डॉलर्सना खरेदी केला. सध्या हा हिरा अल-थानी परिवाराच्या मालकीचा असून, त्याला पुन्हा एकदा ‘कट’ करून अधिक तेजस्वी बनविण्यात आले आहे.

Leave a Comment