फ्रुट सलाडपासून सावध


उत्तम आरोग्यासाठी फळे खाणे नेहमीच फायदेशीर ठरते. फळांचे हे महत्त्व लोकांच्या लक्षात यायला लागले आहे. म्हणून आपल्या आहारात जास्तीत जास्त फळे कशी येतील याचा प्रयत्न लोक करायला लागले आहेत आणि अधिकधिक फळे पोटात जावीत यासाठी सगळी फळे एकत्र करून फ्रुट सलाड तयार करून ते खाण्याकडे लोकांचा ओढा आहे. परंतु सगळीच फळे एकत्र करून खाल्ल्याने फार फायदा होतो असे नाही तर निरनिराळ्या गुणधर्माची फळे एकत्र केल्यामुळे उलट नुकसानच होते. आपण फ्रुट सलाड तयार करतो तेव्हा त्यात टरबुज, खरबुज, मोसंबी, द्राक्षे, चिक्कू, पायनॅपल अशी निरनिराळ्या गुणधर्माची फळे एकत्र केलेली असतात. परंतु या प्रत्येक फळाचा पचनाचा वेळ वेगवेगळा असतो. त्यामुळे ती सगळीच फळे एकदम पचत नाहीत आणि पचनक्रियेत गोंधळ होतो.

काही फळे पचायला जड असतात तर काही फळे खाल्ल्यानंतर जठरात पोहोचायच्या आतच पचन होऊन जातात. ही दोन प्रकारची फळे एकदम खाल्ली तर त्यांच्या पचनासाठी आपल्या अंतर्अवयवामध्ये पाचक रसाचे मिसळणे सुरू होते. पाचक रसाचा वेग ठरलेला आहे. परंतु खाल्लेल्या विविध प्रकारच्या फळांची पाचक रसाची गरज मात्र वेगळी आहे. त्यामुळे काही फळे पचतात आणि काही पचत नाहीत. परिणामी ऍसिडीटी वाढते आणि मळमळायला लागते. म्हणून फु्रट सलाड तयार करताना त्यात घातल्या जाणार्‍या फळांचे गुणधर्म लक्षात घेतले पाहिजेत. संत्रे, मोसंबी, नारंगी, पायनॅपल ही आंबट फळे आहेत. अशा फळांसोबत चिक्कूसारखे गोड फळ घेता कामा नये.

टरबुज, खरबुज ही मेलन जातीची फळे आहेत. त्यांच्यामध्ये इतर फळे मिसळू नयेत. तशी ती मिसळली गेल्यास पोटात विचित्र मिश्रण तयार होते. काही फळांमध्ये शर्करेचे प्रमाण मोठे असते. केळी हे फळ तसे आहे. त्याच्या सोबत संत्रे, मोसंबी यांचे मिश्रण करणे टाळले पाहिजे. विशेषतः काही वेळा फळांसोबत गाजर, काकडी अशा भाज्यांचेही मिश्रण केले जाते. असे मिश्रण करता कामा नये. कारण त्यांचे गुणधर्म वेगळे असतात. पेरु हे सुध्दा अन्य कोणत्याही फळासोबत न मिसळले जाणारे फळ आहे. ते सलाडमध्ये घालताना अन्य फळे कोणती आहेत याचा विचार केला पाहिजे. फळांचे सलाड तयार झाले की सगळ्यात वरच्या बाजूला त्या सलाडला स्ट्रॉबेरीची टोपी घातली जाते. परंतु स्ट्रॉबेरीची ही टोपी केवळ आंबट फळांच्या सलाडलाच घातली पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment