गिनीज बुक मध्ये दोन रेकॉर्ड नोंदविणारा भारतीय जवान लेफ्ट. कर्नल भरत पन्नू

भारतीय सेनेतील लेफ्ट.कर्नल पदावर कार्यरत असलेले भरत पन्नू यांनी सायकलिंग मध्ये दोन गिनीज रेकॉर्ड नोंदविली असून ही कामगिरी बजावणारे ते पाहिले भारतीय सैनिक बनले आहेत. गुरुवारी भारतीय सेनेतील अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली.

भरत पन्नू यांनी १० ऑक्टोबर रोजी लेह मनाली हे ४७२ किमीचे अंतर सायकलने ३५ तास २५ मिनिटात पार करून पहिले गिनीज रेकॉर्ड नोंदविले. उणे १२ तापमानात आणि सहा हजार फुटापेक्षा जास्त उंचीवरून त्यांनी सतत सायकल चालविली. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता याना जोडणाऱ्या सुवर्ण चतुर्भुज मार्गावर त्यांनी दुसरे रेकॉर्ड केले.

दुसऱ्या रेकॉर्ड मध्ये त्यांनी ५९४२ किमीचे अंतर १४ दिवस,२३ तास आणि ५२ मिनिटात पूर्ण केले. १६ ऑक्टोबर रोजी त्यांनी दिल्लीतील इंडिया गेट पासून या प्रवासाची सुरवात केली आणि तेथेच हा प्रवास ३० ऑक्टोबर रोजी संपविला. काही दिवसांपूर्वी त्यांना गीनिज बुक कडून या रेकॉर्ड संदर्भातली प्रमाणपत्रे मिळाली आहेत.