लडाख मध्ये प्रथमच जर्दाळू महोत्सव आयोजन

लेह, नुब्रा, खाल्सी या भागात जर्दाळूची झाडे आता पूर्ण मोहरावर आली असून झाडे पांढऱ्या रंगाच्या नाजूक फुलांनी बहरून आली आहेत. देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी यंदा प्रथमच येथे जर्दाळू महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जर्दाळूचची झाडे फुलणे म्हणजे थंडी संपल्याचा संकेत मानला जातो. लडाखच्या अर्थव्यवस्थेत जर्दाळूचे योगदान महत्वाचे आहे.

सुगीकालात जपान मध्ये असाच चेरी महोत्सव आयोजित केला जातो. काश्मीर मध्ये ट्युलिप महोत्सव असतो. त्याच धर्तीवर या काळात लडाखचे सौंदर्य पर्यटकांना पाहायला मिळावे म्हणून जर्दाळू महोत्सव सादर केला जात आहे. नुब्रा भागात १२, १३ एप्रिल तर खल्सी भागात १७, १८ एप्रिल रोजी हा महोत्सव होणार असून त्यात स्थानिक लोककला सादर केल्या जाणार आहेत. करोना नियमावलीचे काटेखोर पालन करून हे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

शेकडो वर्षापूर्वी चीन मधील व्यापाऱ्यांनी लडाख भागात जर्दाळू झाड आणले असे मानले जाते. या दुर्गम परिसरात या झाडाची वाढ उत्तम प्रकारे झाल्याने आता येथे मोठ्या प्रमाणावर जर्दाळू उत्पादन घेतले जाते. सुके जर्दाळू देशात विदेशात मोठ्या प्रमाणावर विक्री होतात. त्यामुळे लडाखच्या अर्थव्यवस्थेत त्यांना महत्वाचे स्थान मिळाले आहे. लडाखी भाषेत जर्दाळूला चुल्ली, हलमन असे म्हटले जाते.