भाषेतला फरक ओळखणारे ’स्पेलचेकर’

spellमराठीत कोणतेही लिखाण करताना ते एकतर पूर्णतः ग्रांथिक किंवा मग बोली भाषेत करावे. ग्रांथिक किंवा बोलीचे स्वैरमिश्रण करू नये, असा मराठी शुद्ध लेखनाचा नियम आहे. अनवधानाने का होईना बरेचदा हा नियम धाब्यावर बसवून स्वैरमिश्रित लिखाण केले जाते. हे टाळण्यासाठी व शुद्ध मराठीत लेखन व्हावे यासाठी मराठी लेखन कोषाचे संपादक अरुण फडके यांनी ग्रांथिक व बोली भाषेतला फरक ओळखणारे तंत्र विकसित केले आहे.
टाईपरायटर जाऊन कम्प्युटर आल्यानंतर मराठी लेखनाचे काम त्यावर होऊ लागले आणि शुद्ध लेखनासाठी ’स्पेलचेकर’ ची मोठया प्रमाणात गरज भासू लागली. अरुण फडके यांनी अथक परिश्रमानंतर मराठीचा ’स्पेलचेकर’ तयार केला आहे. त्यात या तंत्राचा लवकरच समावेश करण्यात येणार आहे.
बिंझाणी महिला महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या ’संगणकावर मराठीचा सुलभ वापर’ या कार्यशाळेसाठी अरुण फडके नागपूरला आले असता त्यांनी त्यासंदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले, श्रीलिपीमध्ये दिल्या गेलेल्या या स्पेलचेकरमध्ये एक ’ फ्लॅग ’ देण्यात येणार आहे. त्यात बोली आणि ग्रांथिक असे दोन पर्याय असतील. लेखकाने बोली भाषेचा पर्याय निवडल्यानंतर त्यात अनवधानाने ग्रांथिक भाषेचा शब्द लिहीला गेल्यास हा स्पेलचेकर त्या शब्दाला बदलून बोली भाषेत करेल.
शिवाय, अंधःकार, हाहाःकार, घनःश्याम, मेघःश्याम असे शब्द नियमांना डावलून विसर्गाने लिहीले जातात. ते हा स्पेलचेकर शोधेल व योग्य पर्याय उपलब्ध करून देईल. माऊसच्या राईट क्लिकवर चुकीच्या शब्दांबद्दल स्पष्टीकरण उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे अरुण फडके यांनी सांगितले.
जगातील सर्व देश, राजधानीची शहरे, महत्त्वाच्या भाषा, चलन देवनागरीत कसे लिहायचे, याचा मार्गदर्शनासोबतच त्यात हजारो शब्दांची भर घालण्यात आली आहे. इतर भारतीय भाषांना न जमलेली अशी ही गोष्ट अरुण फडके यांनी मराठीत करून दाखवली आहे.
ठाण्याचे शुध्दलेखनकार अरुण फडके यांनी शुध्दलेखनातील चुका टाळण्यासाठी अनेक पुस्तकांचा गाढा अभ्यास करून ६ जानेवारी २००१ रोजी मराठी भाषेतला पहिला शुध्दलेखन कोष तयार केला. त्याला चार नामांकित पुरस्कार प्राप्त झाले. कार्यशाळा, अभ्यासवर्गासोबत पहिली ते एमएपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरीता शुद्धलेखनावर पुस्तके त्यांनी लिहिली. २००४ मध्ये ७० हजार मुख्य शब्द व रूपांसकट कोटींहून अधिक शब्दसंख्या असलेला ’ स्पेलचेकर ’ त्यांनी उपलब्ध करून दिला. या भरीव कामगिरीमुळे पुण्यातील सी डॅक संस्थेने त्यांना मराठी भाषा सल्लागारपदी नेमले. मुंबई मराठी साहित्य संघाने केशव भिकाजी ढवळे पुरस्काराने सन्मानित केले.

Leave a Comment