नॉर्वे पंतप्रधानांना करोना नियम मोडला म्हणून दंड

करोनाचा वेगाने होत असलेला फैलाव लक्षात घेऊन जगभरातील देशात कडक नियमावली, लॉक डाऊन सारख्या उपाययोजना केल्या जात असतानाच नॉर्वेने नियमावलीचे कडक पालन म्हणजे काय याचा आदर्श घालून दिला आहे. नियम तोडला म्हणून नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोल्बार्ग यांना पोलिसांनी २० हजार क्रोन म्हणजे पावणेदोन लाख रुपये दंड ठोठावला.

मिळालेल्या माहितीनुसार नॉर्वे मध्ये १० जणांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास करोना मुळे बंदी केली गेली आहे. ही नियमावली पंतप्रधानांच्या आदेशानेच लागू झाली आहे. पंतप्रधान एर्ना यांचा ६० वा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने त्यांच्या पतीने माउंट रिसोर्ट मध्ये पार्टी ठेवली होती. या पार्टीला १३ निमंत्रित होते. त्यामुळे करोना नियम मोडला गेला. एर्ना यांनी यासाठी माफी मागितली.

पोलीस विभागाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार वास्तविक असा दंड आकाराला जात नाही. ही पार्टी त्यांच्या पतीने ठरविली होती. पण त्याला दंड केला गेलेला नाही. पण पंतप्रधान या सरकारचा चेहरा आहेत. कायदा सर्वांसाठी सारखा आहे याचा जनतेला विश्वास वाटला पाहिजे म्हणून पंतप्रधानांना दंड करणे योग्य आहे. नॉर्वेत १,०१,९६० करोना संक्रमित असून ६८४ मृत्यू झाले आहेत.