सचिन वाझे प्रकरणात मोठा खुलासा होण्याची एनआयएने वर्तवली शक्यता


मुंबई – रोज नवनवी माहिती सचिन वाझे प्रकरणी समोर येत आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज सचिन वाझेंना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पण या दरम्यान आता एक नवी माहिती समोर आली आहे. अँटिलियाबाहेर स्फोटके ठेवल्यानंतर देखील सचिन वाझे अजून काहीतरी मोठे करण्याचे नियोजन करत होते, अशी माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनआयएने या प्रकरणात नुकतीच सचिन वाझेंचे सहकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून एकेकाळी ओळख असलेले निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली आहे. प्रदीप शर्मा यांची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली आहे.

सचिन वाझेंची सध्या एनआयएकडून मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी चौकशी सुरू आहे. आजपर्यंत सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत होते. पण, त्यांची आज कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांची २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यासोबतच विशेष एनआयए न्यायालयाने सीबीआयला एनआयएकडे असलेली कागदपत्र हाताळण्याची परवानगी दिली आहे. सध्या परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करत असून अनिल देशमुखांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएतील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सचिन वाझे अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटके ठेवल्यानंतर देखील अजून काहीतरी मोठे नियोजन करत होते. या सगळ्या प्रकरणात सचिन वाझे यांना प्रदीप शर्मा यांनी तर मदत केली नाही ना, याची सध्या एनआयए चौकशी करत आहे. याशिवाय परमबीर सिंह यांचा देखील एनआयएने जबाब नोंदवून घेतला आहे. पण, तो साक्षीदार म्हणून नोंदवून घेतला असून संशयित म्हणून नसल्याची माहिती एएनआयने दिली आहे.