प्रकाश जावडेकरांचे दावे फेटाळत राजेश टोपेंचे स्पष्टीकरण


मुंबई : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्यामुळे राज्यातील लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण झाला आहे. लस नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारच्या या दाव्यांवरून घणाघाती आरोप केले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरणही दिले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारवर केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी निशाणा साधला होता. आता जावडेकरांनी केलेला दावा फेटाळून लावत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या पत्रानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. महाराष्ट्राला केवळ साडे सात लाख कोरोना लसीचे डोस केंद्र सरकारने दिले आहेत. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा इत्यादी राज्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त लस देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तसेच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असताना लसीचे फक्त साडेसात लाख डोस का? असा प्रश्न विचारात लसी अभावी काही जिल्ह्यात लसीकरण बंद होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.

लसींचा पुरवठा कमी असल्याची तक्रार करत महाराष्ट्रासोबत दुजाभाव होत असल्याचा आरोपही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना केला होता. प्रकाश जावडेकरांनी या पार्श्वभूमीवर राज्याकडे आजही 5 ते 6 दिवसांचा लसींचा साठा शिल्लक असल्याचा दावा केला आहे.

आज सकाळपर्यंत महाराष्ट्र सरकारकडे 23 लाख लसीचे डोस आहेत. दिवसाला 6 लाख डोस दिले, तरी त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या दिवशी येतात. 3-3 दिवसांचे डोस पाईपलाईनमध्ये असतात. 23 लाख म्हणजे 5 ते 6 दिवसांचा स्टॉक आहे. आता तिथून जिल्ह्यांमध्ये ते वितरीत करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकारकडून राज्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा दिला जातो. काल जेवढा पुरवठा असेल, त्याहून जास्त आज दिला जातो. आज जेवढा दिला, त्याहून जास्त उद्या मंजूर होईल, अशी पद्धत असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

5 लाख डोस महाराष्ट्रात तर वाया गेले. कारण नियोजनच व्यवस्थित केले जात नाही, एका वायलमध्ये 10 लोकांना डोस दिला जातो. त्याचे व्यवस्थित नियोजन करायला हवे. आपले काम राज्य सरकार नीट करत नाही आणि दुसऱ्यांवर दोष देत आहे. हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाँटे अशी स्थिती आहे. कुठेही 3 ते 4 दिवसांचा साठा नेहमी असतोच. त्यापुढे तो येतच असतो. जेवढे तुम्ही लसीकरण करता, त्यापेक्षा जास्त डोस केंद्र सरकार देत असते, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले होते.


राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचे सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरण दिले. आपल्या ट्विटमध्ये आरोग्यमंत्री म्हणाले की, लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे, ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. पुढे आणखी एक ट्विट करत राजेश टोपे जावडेकरांना म्हणाले की, आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा.