मुंबईतील सहा रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद


मुंबईः राज्यातील विशेषतः मुंबईमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या सहा रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद करण्यात आली आहे.

तसेच गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांची विभागणी तसेच इतर निर्बंध लावले जाऊ शकतात. पण कोरोना संकट असले तरी रेल्वे सेवा बंद करणार नसल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी २ एप्रिल २०२१ रोजी सांगितले. यानंतर आठवड्याभराच्या अंतराने रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या सहा रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद केली.

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यापासून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत घट दिसत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरुन दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या १८ लाख होती. सध्या दैनंदिन प्रवासी संख्या १५-१६ लाखांवर आली आहे. तसेच मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरुन फेब्रुवारी २०२१ मध्ये दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ४० लाख होती. ही संख्या आता २० लाखांवर आली आहे.

सध्या मध्य रेल्वेच्या रोजच्या ९० टक्के आणि पश्चिम रेल्वेच्या रोजच्या ९५ टक्के फेऱ्या सुरू आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद करणे हा आमचा शेवटचा पर्याय असेल; असे मदत व पुनर्वसन सचिव असीम गुप्ता यांनी सांगितले. मुंबईची उपनगरीय रेल्वे प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांमधून धावते. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने सहा स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबवली आहे.