जो व्यक्ती आपले कुटुंब सांभाळू शकत नाही, तो कोरोनाबाधितांना कसे सांभाळणार?


मुंबई – राज्यावर ओढावलेले कोरोना संकट दिवसेंदिवस अजूनच गडद होत आहे. त्यातच राज्यात दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ सुरू आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी या पार्श्वभूमीवर आज पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. याचबरोबर राज्यात लसींच्या तुटवड्यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, अनिल देशमुख, सचिन वाझे प्रकरणावरून देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

नारायण राणे म्हणाले, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, हा महाराष्ट्र त्यावर उपाययोजना करायला कमी पडला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत रूग्णांची संख्या वाढत आहे, मृत्यूंची संख्या वाढत आहे. राज्य सरकारला याचे गांभीर्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत.

राज्यात डॉक्टर्स नाही, बेड्स नाही, नर्स नाही ही कोणाची जबाबदारी आहे? जसे माझे कुटुंबं माझी जबाबदारी, तर महाराष्ट्र तुमचे कुटुंबं असेल, तर या सर्व गोष्टी उपलब्ध करणे. रूग्णांवर उपचार योग्यप्रकारे करणे, त्यांना बरे करणे ही तुमची तुमची जबाबदारी नाही का? पिंजऱ्यात काय जाऊन बसत आहात, स्वतःला लॉकडाउन करून घेतले आहे. मातोश्रीच्या बाहेर पडत नाही, मग कोरोना होईल कसा? माझे कुटुंब माझी जबाबदारी असताना कुटुंबातील सगळ्या व्यक्ती रूग्णालयात कसे? म्हणजे जो व्यक्ती आपले कुटुंब सांभाळू शकत नाही तो व्यक्ती महाराष्ट्र व कोरोनाबाधित रूग्णांना कसे सांभाळणार? हे अपयश आहे. हे सरकार कोरोना हाताळायला कमी पडले आहे. केंद्राकडे का बोट दाखवता?

तसेच, सचिन वाझेला मुंबईतून १०० कोटी जमा करायला सांगितले, हे आदेश केवळ अनिल देशमुख यांचे नाहीत. यामध्ये सगळे राज्याचे प्रमुख सहभागी आहेत. मग तुम्ही जमा केलेले पैसे, लसीसाठी का नाही वापरत? ते कुठे जातात? कोणाकडे जातात? याबद्दल काहीतरी सांगा. मग बेड नाही व्हेंटिलेटर्स नाही असे सांगितले जाते. वॉर्ड बॉय, नर्स, डॉक्टर्स यांची भरती कोणी करायची? असा सवाल देखील राणेंनी यावेळी उपस्थित केला.

आपले अपयश केंद्राकडे बोट दाखवून झाकायचे काम हे राज्य सरकार करत आहे. या सरकारचा जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस जनतेचे शोषण करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. सर्व ठिकाणी भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी राणेंनी ठाकरे सरकारवर केला.