दिल्लीतील सर्व शाळा पुढील आदेशापर्यंत बंद


नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा वाढ होत असल्यामुळे येथील केजरीवाल सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खबरदारी म्हणून दिल्लीतील सर्व शाळा (शासकीय, खाजगी) पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

याबाबतची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून दिली आहे. दरम्यान, दिल्लीत येत्या सोमवारपासून सहाव्या सेरो सर्वेक्षणचे काम सुरू होणार आहे. सहाव्या सर्वेक्षणात 28 हजार नमुने 272 प्रभागांत घेण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रभागातील 100 लोकांचे नमुने गोळा करण्याची योजना आहे. केवळ अशाच लोकांचा या सर्वेक्षणात समावेश आहे ज्यांना लस देण्यात आली आहे.

यापूर्वी पाचवा सेरो सर्वेक्षण जानेवारीत करण्यात आले होते. त्यातच दिल्लीच्या निम्म्याहून अधिक लोकांमध्ये कोरोनाची लागण झाली. पाचवा सर्वेक्षण 15 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान घेण्यात आला. त्यात एकूण 28000 लोकांचे नमुने घेण्यात आले. सर्वेक्षण केलेल्या 56.13टक्के लोकांमध्ये कोरोनाविरूद्ध अँटीबॉडीज आढळल्या होत्या.