हैद्राबाद येथे करा मस्त शॉपिंग तेही स्वस्तात

हैद्राबाद या इतिहासिक शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. एकेकाळी निजामाच्या राजधानीचे हे शहर आज प्रसिद्ध आहे ते तेथील ऐतिहासिक वस्तू, कला आणि चिकन बिर्याणी साठी. पण येथे स्ट्रीट शॉपिंग सुद्धा जरूर अनुभवले पाहिजे. स्वस्तात मस्त खरेदी साठी येथे असे अनेक बाजार प्रसिध्द आहेत.

बेगम बाजार हा येथील सर्वात जुना म्हणजे १५० वर्षे जुना बाजार. येथे सजावटीचे सामान, गृहपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, परफ्युम्स, ज्वेलरीची अनेक दुकाने आहेत. मनपसंत चीज मिळण्याचे हे ठिकाण. येथून देशभरात व्यापार होतो.

दुसरा बाजार म्हणजे कोटी मार्केट. ब्रिटीश शासन काळापासून हे मार्केट आहे. बेगम बाजारप्रमाणेच येथे ज्वेलरी, चप्पल, बॅग्जची प्रचंड व्हरायटी पाहायला मिळते. लाड बाजार हा चुडी बाजार म्हणूनही प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध चारमिनार जवळ हा बाजार असून येथे नेहमीच गर्दी असते. विविध प्रकारच्या बांगड्या येथे मिळतात. शिवाय ज्वेलरी, सिल्क साड्या, परफ्युम सुद्धा खरेदी करता येतात.

मोझामझाई मार्केट निजाम काळापासून अस्तित्वात आहे. येथे रस्त्यावरच अनेक वस्तू विक्रीसाठी असतात. चिकन, मांस, फळे, सुका मेवा, परफ्युम येथे चांगली मिळतात. नामपल्ली नावाच्या बाजारात सुद्धा स्ट्रीट शॉपिंग चा पुरेपूर आनंद लुटता येतो. येथे बॅग्ज, ज्युवेलरी, बांगड्या, चपला अशी खरेदी स्वस्तात करता येते. जानेवारी फेब्रुवारी मध्ये येथे प्रदर्शने लागतात. त्यातही स्वस्त वस्तू मिळतात.