वापरलेले मास्क, पीपीई किट जगभरात बनले संकट

करोना मुळे केवळ माणसाचे आयुष्यच धोक्यात आलेले नाही तर पर्यावरण सुद्धा धोक्यात आल्याचे दिसत आहे. करोना बचावासाठी वापरले जात असलेले सिंगल युज मास्क आणि पीपीई किट जगासमोर मोठी समस्या बनली आहे. कोट्यावधींच्या संखेने या वस्तू वापरल्या जात आहेत पण त्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे जगभरातील समुद्र किनारे, नद्या आणि जमिनीवर हे वापरले मास्क, पीपीई किट ढिगाने पडलेले दिसत आहेत.

बुधवारी न्यूजर्सी येथील ‘क्लीन ओशन एन्व्हायर्नमेंट’ ग्रुपने फेकल्या गेलेल्या वस्तूंची यादी सादर केली आहे. त्यात सिगरेट, प्लास्टिक, खाद्य पदार्थ पॅक यांच्या बरोबरच मोठ्या संखेने मास्क आहेत. पीपीई किट आणि मास्कच्या वापराने करोनाचा धोका कमी होतो हे खरे असले तरी दुसरीकडे हे फेकून दिलेले मास्क आणि किट समुद्राच्या पाण्यात जात असल्याने समुद्री जीवन धोक्यात आले आहे.

डिस्पोजेबल म्हणून विकले जात असलेले हे मास्क आणि पीपीई किट सिंगल युज प्लास्टिक सारखेच काम करत आहेत. ते पूर्ण नष्ट होत नाहीत तर त्याचे छोटे तुकडे दीर्घकाळ तसेच पडून राहतात. सागर सुरक्षा तज्ञ निकोलस मालोस यांनी केलेल्या संशोधानुसार १ मास्क एक दिवसात १ लाख ७३ हजार मायक्रोफायबर तुकड्यात विभागला जातो यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.