पुणे : पुणे शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. शहरातील आरोग्य व्यवस्था रोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्यामुळे ढासळत चालल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पण योग्य पद्धतीने संपूर्ण यंत्रणा परिस्थिती हाताळत असून आवश्यक त्या उपाययोजना केल्याची माहिती पुण्याचे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने बेडची गरज वाढली. पण आवश्यकतेनुसार वाढ करत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्यापासूनच्या कडक लॉकडाऊनसाठी पुणे महापालिका सज्ज
गेल्या दोन दिवसांत पुण्यात व्हेंटिलिटेरचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याबाबत माहिती देताना आयुक्तांनी सांगितले की, पुण्यात एकूण 550 व्हेंटिलेटर बेड पैकी फक्त 2 शिल्लक होते. पण, लष्कराकडून 20 व्हेंटिलेटर बेड आणि 20 आयसीयू बेड मिळणार असून पुढील चार दिवसांत 50 व्हेंटिलेटर बेड वाढवणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ऑक्सिजन बेडचा विचार करता पुण्यात 400 ऑक्सिजन बेड शिल्लक असून त्यात आणखी 350 ऑक्सिजन बेड वाढवत असल्याचेही आयुक्त यावेळी म्हणाले.