भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन


मुंबई : प्राणांचे बलिदान देणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले.

‘गजापुरचा रणसंग्राम’ या शंतनू परांजपे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे स्वागत करताना महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे लिखाण हिंदी भाषेत देखील व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. जगात कोणत्याही देशापेक्षा महाराष्ट्रात जास्त गडकिल्ले असून, या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे असेही राज्यपालांनी सांगितले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हेडविग मीडिया हाऊस प्रकाशन संस्थेचे चिन्मय पंडित, मुद्रक विशाल देशपांडे, प्रदीप पंडित व अपूर्वा पंडित उपस्थित होते.

शिवाजी महाराजांची पन्हाळा वेढ्यातून सुटका आणि विशाळगडापर्यंत त्यांचा सुखरूप झालेला प्रवास, बाजीप्रभू आणि बांदल सेनेला करावा लागलेला घनघोर संघर्ष तसेच संघर्षात सामील असलेल्या सिद्दी जौहर, हेन्री रेव्हिंगटन, शिवा काशीद, बांदल घराणे व बाजीप्रभू घराणे यांचा इतिहास या पुस्तकामध्ये देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.