मुंबई : मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी आणि एनकाऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांच्यापर्यत सचिन वाझे यांच्यासंदर्भातील तपास आता पोहचला आहे. प्रदीप शर्मा यांचा या प्रकरणात सहभागाचा संशय महाराष्ट्र ‘एटीएस’ला (अॅंटी टेररिस्ट स्क्वॉड) वाटत असल्यामुळे या प्रकरणाचा विस्तार आता प्रदीप शर्मा यांच्यापर्यत पोहचला आहे. आता महाराष्ट्र एटीएसने दिलेल्या नव्या माहितीनुसार एनआयए तपास करत आहे.
मनसुख हिरेन प्रकरण : प्रदीप शर्मा आणि सचिन वाझेची २ मार्चला झाली भेट
यासंदर्भात टाईम्स नाऊला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप शर्मा यांची सचिन वाझेंशी २ मार्चला भेट झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी शर्मा हे मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनिशी सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात एनआयएसमोर चौकशीसाठी हजर झाल्याने या नव्या घडामोडी समोर आल्या आहेत. एनआयएकडून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचाही तपास केला जात आहे.
एनआयएसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी प्रदीप शर्मा हजर झाले होते. एनआयएच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात एक वाजेच्या सुमारास ते आले होते. बुधवारी प्रदीप शर्मा यांची जवळपास सात तास चौकशी झाली होती.