वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे न्यूझीलंडमध्ये भारतीयांना प्रवेश नाही


ऑकलंड : न्यूझीलंड सरकारने भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भारतीयांना न्यूझीलंडमध्ये येण्यास बंदी घातली आहे. त्यात भारतात आलेल्या न्यूझीलंडच्या नागरिकांवरही ही बंदी लागू केली असल्याची घोषणा न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी आज केली.

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर न्यूझीलंडने तातडीने प्रभावी उपाय योजना लागू केल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये अतिशय अल्प प्रमाणावर कोरोनाबाधित आढळून आले होते. न्यूझीलंडच्या सीमेवर गुरुवारी २३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. त्यातील १७ हे भारतातून आलेले प्रवासी होते. त्यामुळे तातडीने भारतीय प्रवाशांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ११ एप्रिलपासून ही बंदी २८ एप्रिलपर्यंत लागू करण्यात आली आहे.

पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी ऑकलंडमध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही भारतीय प्रवाशांसाठी न्यूझीलंडमध्ये तात्पुरते प्रवेश बंद करत आहोत. न्यूझीलंडमधील ही बंदी ११ एप्रिल रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजता सुरु होईल आणि ती २८ एप्रिलपर्यंत सुरु राहील. त्यानंतर रिक्स मॅनेजमेंट जोखीमीचा विचार करुन पुढील निर्णय घेईल.