उद्या जर तातडीने मुंबईला लस पुरवठा झाला नाही तर सगळी लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की


मुंबई : सर्वाधिक कोरोनाबाधित आर्थिक राजधानी मुंबईत आहेत आणि आता लसीकरण बंद पडण्याच्या मार्गावर आहे. जर उद्या तातडीने मुंबईला लस पुरवठा झाला नाही तर मुंबईतील सगळी लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढावणार असल्यामुळे महाराष्ट्रातीलच नाहीतर देशभरातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतच लसीकरण ठप्प होणार आहे.

मुंबईला एक दिवसात लस मिळाली नाही तर परवापासून संपूर्ण मुंबईतील लसीकरण ठप्प होणार आहे. उद्या सर्व खाजगी सेंटर तर परवा सर्व शासकीय केंद्र सुद्धा लस पुरवठ्याअभावी बंद होणार आहे. मुंबईतील 50% लसीकरण केंद्र आज लस पुरवठ्याअभावी बंद आहेत. उद्या सर्व खाजगी लसीकरण केंद्र बंद होतील तर परवापर्यंत संपूर्ण मुंबईतील लसीकरण ठप्प होईल.

आज मुंबईतील 120 सेंटरपैकी 26 खाजगी लसीकरण केंद्र बंद झाली तर, 24 केंद्र आज संध्याकाळपर्यंत बंद होतील. मुंबईत एकूण 120 सेंटर आहेत त्यांपैकी 73 खाजगी सेंटर आहेत.

आम्ही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत चार महत्त्वाचे विषय मांडणार आहोत. हे विषय म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा आणि दर नियंत्रण, शेजारील राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा, कोरोना लसीचे डोस आणि व्हेंटिलेटर हे प्रमुख मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडणार असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितलं.

केंद्राकडून नुकतीच मला माहिती मिळाली आहे की, कोरोना लसीचे डोस सात लाखांवरुन 17 लाखांवर वाढवण्यात आले आहेत. तरीही हे डोस कमी आहेत, कारण आम्हाला आठवड्याला 40 लाख डोसची गरज असल्यामुळे 17 लाख डोस पुरेसे नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

भाजपशासित राज्यांना जास्तीचा लस साठा देण्यात आल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशला 44 लाख डोस, मध्य प्रदेशला 33 लाख डोस, गुजरातला 16 लाख लस, कर्नाटक 23 लाख डोस, हरियाणा 24 लाख डोस, झारखंड 20 लाख डोस केंद्राने दिले आहेत.